– सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने दिले माहिती
The गडविश्व
नवी दिल्ली : आयकर पोर्टलमधील अडचणींमुळे ज्या करदात्यांनी अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच आयकर रिटर्न दाखल केलेला नाही, ते 5000 रुपयांच्या दंडासह आयकर रिटर्न 31 मार्च 2022 पर्यंत भरू शकतात. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) ऑडिट रिपोर्ट आणि आयकर रिटर्नचे फिजिकल फायलिंग यापुढे सुरू राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
गुजरात उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आयकर पोर्टलच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन रिटर्न भरण्यासाठी फिजिकल फायलिंग करण्याची परवानगी देण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते. दक्षिण गुजरात इन्कम टॅक्स बार असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि आयटीआरची फिजिकल कॉपी जमा करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती.
गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पार्दीवाला आणि न्यायमूर्ती निशा एम. ठाकोर यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, ‘आयकर पोर्टलच्या उणीवा लक्षात घेऊन सरकारने फिजिकल फायलिंगला परवानगी द्यावी. तसेच सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने आयटीआर भरण्यासाठी व्यवहार्य पद्धतीचा अवलंब करावा.’ यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘जर सरकारने आयकर पोर्टलच्या त्रुटी लक्षात घेऊन फिजिकल फायलिंगला परवानगी दिली, तर त्याचा करदात्यांना फायदाच होईल.’
