वचनाचे पालन करा, अवैध दारूविक्री बंद करा

113

– अहेरीतील महिलांचे नगराध्यक्षाना निवेदन
The गडविश्व
गडचिरोली : नगर पंचायत निवडणुकीत आपण दिलेल्या वचना प्रमाणे, प्राथमिकता देवून अहेरी शहरातील काही वार्डात सुरु असलेली अवैध दारूविक्री त्वरित थांबवा. अशी मागणी अहेरी शहरातील महिलांनी महिला दिनानिमित्त नपं नगराध्यक्षाना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अहेरी शहरातील काही वार्डात मिळत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागतो. शहरात दारू उपलब्धीमुळे कमी वयाचे मुले, तरूण दारूकडे वळत आहेत, व्यसनी होत आहेत. शहरातील काही वार्डात अवैध दारू विक्री पूर्णत: बंद झाल्यास पुरुषांमधील दारू पिणे बंद होईल, घरात, वार्डात होणारे भांडण तंटे कमी होतील.शहरातील गुन्ह्यांच्या संख्येत घट होईल. त्यामुळे अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी सहकार्य केल्यास नगराचा विकास करण्यास जनतेची चांगली साथ मिळेल.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २९ वर्षापासून दारूबंदी आहे. दारूबंदी जनतेच्या हिताची आहे. शहरातील अवैध दारूविक्री बंद करून, दारूबंदी अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. यासाठी नगर पंचायतीतर्फे नगर दारूमुक्तीचा प्रस्ताव पारित करून दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करा. नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक वार्डात दारू व्यसनींच्या उपचारासाठी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यासाठी सहकार्य करा. निवडून येण्यापूर्वी आपण दिलेला वचननाम्याचे पालन करीत शहरातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी सहकार्य करा, अशी मागणी अहेरी शहरातील विविध वार्डातील महिलांनी शहराच्या नगराध्यक्षा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष रोज्या करवेत यांनी स्वतः उपस्थित राहून निवेदन स्वीकारले. यावेळी नगरसेवक ज्योती सडमेक, सुनीता मंथनवार, शेख नौरास रियाज मोहम्मद, शालिनी पोहनेकर, विलास गलबले उपस्थित होते. नगरसेवकांच्या व प्रशासनाच्या मदतीने शहरातील अवैध दारू बंद करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्याची ग्वाही नगराध्यक्षानी उपस्थित महिलांना दिली. विशेष म्हणजे नगरसेवक विलास गलबले यांनी वॉर्ड न.१७ मधे मुक्तिपथ व स्थानिक पोलीस पाटील दुर्गे यांच्या मदतीने उद्या ९ मार्चला व्यसन उपचार शिबीर घेण्याचे जाहीर केले, ही महत्वाची उपलब्धी या कार्यक्रमातून निघाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here