– स्वतः वापर व विक्रीसाठी नियोजन करण्याचा पुलखल ग्रामसभेने एकमताने ठराव केला पारित
The गडविश्व
गडचिरोली २३ ऑगस्ट : शासनाच्या खनिकर्म विभागाच्या मार्फत सन २०२२ – २३ व पुढिल तीन वर्षांसाठी रेतीघाट लिलाव करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव पुलखल ग्रामसभेने आजच्या ग्रामसभेत एकमताने नाकारला व निस्तार हक्कानुसार गावातील नागरिकांना आवश्यक कामासाठी वापर तसेच गावातील बेरोजगारी दूर करण्यासाठी व स्वतः रेती विक्री करण्यासाठी संघर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पारित केला आहे.
आज झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी जयश्रीताई वेळदा तर सरपंचा सावित्री गेडाम, उपसरपंच रुमनबाई ठाकरे, ग्रा.पं. सदस्य तुकाराम गेडाम, कविता ठाकरे, खुशाब ठाकरे, जिजाबाई आलाम, सचिव एन.डी. मोटघरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गिरिधर ठाकरे, माजी सरपंचा रेखाताई सेडमाके, जेष्ठ नागरिक सितकुराजी जराते, आनंदराव ठाकरे, शामराव ठाकरे, कवळू रोहणकर, मायाबाई ठाकरे, शामलाबाई पालकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सन २०२२-२३ आणि २०२३-२४ चा नियोजन आराखडा तयार करणे, विधवा प्रथा बंद करणे, गावातील ढिवर समाजाला तलावांमध्ये मच्छीपालनाचे अधिकार देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने वाढीव पाणी पुरवठा आणि जलशुद्धीकरण यंत्रणा बसविणे, रस्ते मजबूतीकरण, पथदिव्यांची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगण विकासाचे नियोजन करणे यासारखे ठरावही एकमताने पारित करण्यात आले. या ग्रामसभेला दिडशेहून अधिक महिला, पुरुष उपस्थित होते.