The गडविश्व
गडचिरोली, २२ नोव्हेंबर : गडचिरोली पोलीस विभागाचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक रुजू झाल्यानंतर गडचिरोली शहरात व जिल्ह्याच्या इतरही तालुक्यात अवैध दारू विक्री बंदी करिता पोलीस विभागाकडून धडक मोहीम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून गडचिरोली शहरात अवैध दारू विक्री सध्यस्थितीत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वडसा तालुक्यातील व कुरखेडा तालुक्यातील काही होलसेल विक्रेत्यावर कारवाया करण्यात आल्या असून विक्रीचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. या संबधातील बातम्या दररोज स्थानिक वर्तमान पत्रात प्रसिद्ध होत असून गडचिरोली शहरातील स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे. हे चित्र बघता मुक्तिपथ अभियान व मुक्तिपथ गडचिरोली शहर संघटन सदस्या द्वारा पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व पोलीसविभागाचे तालुका पातळीचे त्यांचे सर्व पोलीस अधिकारी, यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात येत असल्याचे मुक्तिपथचे संचालक तपोजेय मुखर्जी व उपसंचालक संतोष सावळकर यांनी सांगितले आहे.
पोलीस विभागाने ठरविल्यास आवश्यक ते नियोजन करून अवैध दारू विक्री पूर्णपणे नियंत्रण करणे शक्य आहे. पोलीस विभागाकडून अशा कारवाया नियमित सुरु राहाव्या, शहरासोबतच ज्या मोठ्या व शहराला लागून असलेल्या गावात अवैध दारूविक्री सुरु आहे त्या गावात सुद्धा विशेष कार्यवाही करून अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करावी, होलसेल विक्रेत्यावर कडक कार्यवाही करून त्यांना शिक्षेपर्यंत पोचवावे अशी अपेक्षा व आवाहन मुक्तिपथ द्वारा पोलीस विभागाला करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सोबत लवकरच मुक्तिपथ अभियानाचे सर्व तालुका संघटक यांचेसह बैठक घेणार असून जिल्ह्यातील अवैध दारू विक्री बंदी साठी निवेदन व माहिती अहवाल देणार असल्याचे मुक्तिपथ अभियाना द्वारे सांगण्यात आले आहे.
