The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) १२ सप्टेंबर : राज्यातील काही जिल्हयामध्ये जनावरांना लंम्पी स्किन (lumy skin) या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदर रोग हा प्रामुख्याने गो-वंशीय जनावरामध्ये आढळून येत आहे.सद्यास्थितीत म्हैसवर्गीय जनावरामध्ये सदर रोगाचा रोग प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न् झालेले नाही. गडचिरोली जिल्हयातील सर्व जनावरांचा सदर रोगापासून बचाव होण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ.वि.अ.गाडगे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प.डॉ.सुरेश कुभंरे यांनी केले आहे.
लम्पी स्किन हा विषाणुजन्य रोग असून याचा झपाटयाने प्रसार होतो.प्रसाराकरीता जनावराच्या अंगावरील गो-माशा,गोचीड व डास सारखे परजिवी कारणीभूत ठरतात.या रोगात प्रामुख्याने जनावरांना ताप येतो,नाकातुन व तोंडातुन स्त्राव गळणे,डोळयापासून पाणी गळणे,कातळीवर गाठी येणे यासारखी लक्षणे दिसुन येतात.जरी हा रोग संसर्गजन्य असला तरी तो वेळीच योग्य उपचार झाल्यास शंभर टक्के बरा होतो. व या रोगात मृत्यृचे प्रमाण फार कमी असल्यामुळे पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये. आपले जनावर आजारी असल्याचे लक्षात आल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावेत.
आजारी जनावरास ईतर जनावरापासून वेगळे ठेवण्यात यावे. गोठयात व इतर जनावरांवर पशुवैद्यकाच्या सल्याने योग्य औषधाची फवारणी करुन घेऊन गोचीड,गो-माशा याचे निर्मुलन करण्यात यावे. बाधित जनावरांची एका ठिकाणावरुन दसरीकडे वाहतूक करण्यात येवु नये. जिल्हयामध्ये सद्यास्थितीत दहा हजार लसमात्रा साठा उपलब्ध करण्यात आलेला असून आवश्यकते प्रमाणे अजुनही लस उपलब्ध होईल. तरी सर्व पशुपालकांनी दक्ष राहुन आपल्या पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.