नगरपरिषद आरमोरी व मुक्तिपथ द्वारा व्यसनउपचार शिबीर संपन्न

188

– २७ रुग्णांवर उपचार
The गडविश्व
गडचिरोली, १ सप्टेंबर : आरमोरी नगरपरिषद व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव भवनात व्यसन उपचार मोहल्ला क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २७ रुग्णांनी उपचार घेतला.
ज्या रुग्णांना रोज पिण्याची सवय आहे किंवा दारूच्या व्यसनामुळे आता त्रास जाणवत आहे अशा रुग्णांना शहरात उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती व मुक्तिपथ अभियानाच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन केले गेले. शहरातील वॉर्डावॉर्डात व्यसन उपचार शिबिराबाबत शिबीर पूर्व एक आठवडा जनजागृती करण्यात आली. नगर परिषद द्वारा कचरा गाडीवर ऑडीओ क्लिप वाजवून व मुक्तिपथ द्वारा शहरातील मुख्य ठिकाणी पोस्टर लावून नागरिकांना शिबिराची माहिती देण्यात आली. या शिबिरामध्ये एकूण २७ रुग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. शिवाय इतर नोंदणी केलेल्या उर्वरित रुग्णांना नियमित दर सोमवारी शक्ती नगर येथे असलेल्या आरमोरी तालुका क्लिनिकला उपचारासाठी येण्याचे सांगितले आहे.
शिबिरात रुग्णांवर सर्चमधील प्रशिक्षित चमूंनी उपचार केला. दारूची सवय कशी लागते. शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, घटक आदींची माहिती देत मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी मार्गदर्शन तर प्राजु गायकवाड यांनी रुग्णांना समुपदेशन केले. रुग्णांची केस हिष्ट्री संयोजक प्रभाकर केळझरकर, प्राजक्ता मेश्राम, पल्लवी मेश्राम, सुषमा वासनिक यांनी घेतली. शिबिराचे संयोजन मुक्तीपथ तालुका संघटक भारती उपाध्याय आणि अनुप नंदगीरवार यांनी केले. यावेळी न.प. मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती क्षीरसागर नाकाडे, सचिव निमजे, होमगार्ड तालुका समादेशक अनिल सोमनकर यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. संबधित सर्व अधिकारी वर्गानी उत्तम सहकार्य याठिकाणी दिले व पुढे या प्रकारचे उपचार शिबीर घेऊन अधिक व्यसनिंना दारूपासून आपण दूर करू असा विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here